मंडळाचा इतिहास

प्रिय भक्तजन हो,

सप्रेम नमस्कार,

तो काळ होता १९४४ चा, स्वातंत्र्यपूर्वीचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एकात्मतेच्या उद्देशाने सुरु केलेल्या गणेशोत्सवाला एका सणाचे स्वरूप येऊ लागले होते. वातावरण अत्यंत भारावलेले असायचे. तेच वातावरण पुढे ठेवण्याच्या प्रमुख उद्देशाने मंडळाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आणि पहिल्याच वेळी म्हणजे १९४४ ला पुठ्याची देवी चाळ क्र. १९ मध्ये बसवून नवरात्रौत्सवाची सुरुवात केली. १९४५ ला मात्र चाळ क्र. १ व १९ च्या भव्य पटांगणात आता आहे त्याच जागेवर मुर्ती बनवून नवरात्र साजरा केला. त्यावेळी उद्योगपती बाळशेठ रायकर यांनी मोलाचे सहकार्य केले होते.

१९४६ पासुन मात्र ही भवानी माता जागृत असल्याचे उदाहरण समोर आले. पेशाने मुर्तीकार असलेले सावर्डेकर नावाचे एक गृहस्थ परळच्या के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या स्वप्नात भवानी माता आली आणि तिने त्यांना दृष्टांत दिला की, मला नायगांवात कायम स्वरूपी बसायचे आहे. आजारपणातून बरे झाल्यानंतर सावर्डेकर थेट नायगांवमध्ये आले. त्यांनी ही हकीकत कार्यकर्त्यांना सांगितली. काहींना खरे वाटले नाही. पण एकूणच सगळी माहिती काढल्यानंतर सावर्डेकर खरे बोलत असल्याचे जाणवले. कार्यकर्त्यांनी चंदनाची मुर्ती बनविण्याचे ठरविले. त्यासाठी सातशे रुपये खर्च आला. त्याकाळात सातशे रूपयेदेखील मोठी रक्कम होती. सगळ्यांनी एक - एक, दोन - दोन रुपये जमा करून ती रक्कम मुर्तीकार सावर्डेकर यांना दिली. त्यांनीही चंदनाच्या एकाच खोडातून भवानीमातेची मुर्ती घडवली. ती मुर्ती नावरात्रौत्सावानंतर एका खोलीत स्वतंत्र ठेवली जाऊ लागली. तिची वर्षभर पूजा-अर्चा सुरु झाली. तेव्हापासून एक जागृत देवस्थान म्हणून भाविक या मातेकडे पाहतात. तसेच त्याची प्रचीती सन १९८४ ला आली.

ती घटना आठवली की, आजही अंगावर शहारे येतात. केवळ आई भवानीमातेच्या कृपेनेच 'ते' अरिष्ट टळले. नवरात्रौत्सवातील तो नवमीचा दिवस होता. सकाळी दरवर्षीप्रमाणे होम हवन होऊन भक्त मातेचे दर्शन घेत होते. दिवसभर हा कार्यक्रम सुरु होता. संध्याकाळी अचानक मंडपाला आगीने आपल्या कह्यात घेतले. एकाच हाहाकार उडाला. कुणालाच काही सुचत नव्हते. मनात एकच विचार की, भवानी मातेच्या मुर्तीला काही होता कामा नये. कार्यकर्त्यांनी स्वतःचा मागचा पुढचा विचार न करता आगीत उडी घेऊन मुर्ती सुखरूप बाहेर काढली.

जणू या जागेवर मातेला केवळ नऊ दिवस न बसवता कायम स्वरूपी बसायचे होते. जुन्या मंडळी नीही १९४६ ची आठवण करून दिली. बस्स ! ठरले !! त्याच जागी मातेचे भव्य मंदिर उभारायची कल्पना पुढे आली आणि एक दिलाने सगळे कामाला लागले. नायगांवातूनच नव्हे तर अखंड मुंबईतून या कल्पनेला प्रोत्साहन व मदत मिळाली. सन १९८६ ला सुरु केलेली भवानी मातेच्या मंदिराची संकल्पना ४ नोव्हेंबर १९९३ रोजी मुहूर्त स्वरुपात आली. या कामी माजी मंत्री श्री. गणेश नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले. विधिवत उद्दघाटनही झाले. तीन दिवस सुरु असलेल्या उद्दघाटन सोहळ्याला परमपुज्य स्वामी श्री. गगनगिरी महाराज, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. दाजी पणशीकर हे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे हा उदघाटन सोहळा म्हणजे नायगांवातील एक सुवर्णक्षणच ठरला. स्थानिक आमदार मा. श्री. कालिदास कोळंबकर यांचे पाठबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.

बघता-बघता दिवस गेले, वर्षे सरली. यानिमित्ताने काही मागच्या घटनांचा आढावा घेण्याचा हा छोटासा खटाटोप केला. एखादी संस्था, मंडळ टिकते, भरभराटीला येते, ते प्रामाणिक व सचोटीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच. सुदैवाने या मंडळालाही तसेच कार्यकर्ते लाभले यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो, कै. विष्णू हरी पवार (बाबूलाल शेठ), कै. बाळशेठ रायकर, कै. खंडूशेठ, कै. कृष्णा फाटक, कै. संभाजी सरफरे, कै. भगवानराव पवार, कै. गोविंद पोवळकर, कै. वामनबुवा खोपकर यांचा. या कार्यकर्त्यांनी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज त्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले.

खर तर नायगावची ही आदीशक्ती आदीमाता नवसाला पावणारी देवता म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिच्या वास्तव्याने पुनित झालेला हा सारा परिसर धार्मिक मंगलमय व भक्तिपूर्ण व्हावा अशी मंडळाची धारणा आहे तसेच हे मंदिर न राहता या माध्यमातून सामाजिक सेवेची एक गंगोत्री निर्माण व्हावी व या परिसरातील गोरगरीब , कष्टकरी जनतेच्या घरांघरांत जावी, त्यांचा सामाजिक,शैक्षणिक उत्त्कर्ष व्हावा अशीच मंडळाची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी मंडळ सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे.

स्थानिक आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या आमदार निधीतून मंदिर परिसराचा विकास करण्याची एक योजना मंडळाने राबविली आहे. शिवसेना उपनेते श्री. अरविंद सावंत साहेब यांच्या आमदार फंडातून नायगावकरांच्या सेवेसाठी भव्य समाज मंदिराची उभारणी पूर्ण झालेली आहे. सभा मंडपावरील पत्र्यांचे नुतनीकरण माजी नगरसेवक श्री. हेमंत डोके यांच्या सौजन्याने करण्यात येत आहे. ओंकार अकादमीच्या सहकार्याने मंडळाने IAS / IPS / UPSC/ MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्री. पवार सर व त्यांचे सर्व तज्ञ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. अहवालसाली गरजू रुग्णांसाठी मंडळाने साजवेल व सेराजेम या मेडीकल संस्थांच्या सहकार्याने मेडीकल क्यांप आयोजित केले. एकूण ५०० रुग्णांनी या संधीचा लाभ घेतला. दरवर्षी मंडळाच्या वतीने एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येते. राजीव गांधी आरोग्य योजने अंतर्गत मोफत मोठ्या तपासण्या व शस्त्रक्रिया मंडळाच्या सहकार्याने गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्या साठी मार्गदर्शन करण्यात येते. ह्यावर्षी घडलेल्या महाराष्ट्रातील भयंकर दुष्काळात दुष्काळग्रस्त लोकांसाठी मंडळाने आपला सामाजिक बांधिलकीचा खारीचा वाटा उचलून आर्थिक मदत केली आहे. त्याच प्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिंओ लसीकरण या मोहिमेसाठी संस्थेने कायमस्वरूपी विनामूल्यजागा उपलब्ध करून दिली आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी भव्य प्रमाणात भवानीमाता चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते.मंडळाच्या वतीने दरवर्षी दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येतो.

भवानी मातेचा मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करण्याच्या प्रयत्नातूनच दोन चाळींच्या मध्ये एक सुंदर संगमरवरीप्रवेशद्वार उभे राहिले.या उपक्रमात श्री. उदय मास्टर या दानशूर व्यक्तीने विशेष आर्थिक सहकार्य केले.मंदिर उभारणीच्या तसेच मंडळाच्या सर्वच उपक्रमांमध्ये आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब, नगरसेवक श्री. सुनील मोरे, श्री. दत्ता दिवेकर, श्री. रमेश पवार, श्री. दत्ताजी पवार, श्री. हितेन्द्रभाई संघोई, श्री. प्रकाश भिमनपल्ली, व्यापारी असोशिएशन-नायगाव, श्री. सुरेश जैन, श्री. प्रकाश गुणवंतलाल, मेसर्स सुमन मोटल्स लि.अशा अनेक मान्यवरांच्या सहकार्याने मंडळाने यशस्वी केले आहेत.

यंदाच्या महोत्सवामध्ये या सर्वांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. मंडळातर्फे अनेक सेवाभावी उपक्रम राबवायचे आहेत. विविध लोकोपयोगी सेवांना मूर्त स्वरूप आणायचे आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह, दानशूर व्यक्तींचे सहकार्य आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद या पाठबळावर मंडळ अमृत महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. या सर्व कार्यात आम्हाला यश लाभो, अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून या आनंदी वातावरणात आपण सर्वांनी सहभागी व्हावे हि सदिच्छा व्यक्त करतो.

लोभ आहेच तो वृधीगंत व्हावा.

आपले नम्र
नायंगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ.
कार्यकारिणीव्हिडीओज़

आजच्या साड्या

  • मृण्मयी घाडीगांवकर
  • विहा राणे
  • सुरेश कदम
  • दांडेकर महाराज

आपत्कालिन नंबर

  • मुंबई पोलिस - १०९०
  • महिला सुरक्षा - १०९१
  • रुग्णवाहिका - १०२
  • बाल कामगार - १०९८